हिजाब प्रकरणावरून बॉलिवूड मधूनही तीव्र प्रतिक्रिया , जावेद अख्तर म्हणाले नितीश कुमारांनी माफी मागावी

Foto
मुंबई : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एका कार्यक्रमात मुस्लिम महिला डॉक्टरचा हिजाब/बुरखा ओढल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र वाद निर्माण झाला आहे. या घटनेनंतर देशभरातून टीकेचा सूर उमटत असून, नितीश कुमारांनी माफी मागण्याची मागणी केली जात आहे. आता बॉलिवूडमधील नामवंत गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनीही या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

जावेद अख्तर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत नितीश कुमार यांच्या वर्तनाचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, “मला ओळखत असलेल्या लोकांना माहिती की, मी पारंपरिक पर्दा(हिजाब) किंवा घुंगटच्या पूर्ण विरोधात आहे. मात्र याचा अर्थ असा होत नाही की, नितीश कुमारांनी मुस्लिम महिला डॉक्टरसोबत केलेले कृत्य योग्य आहे. मी याचा तीव्र निषेध करतो. नितीश कुमार यांनी त्या महिलेची बिनशर्त माफी मागितली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली आहे.

बॉलिवूडमधून वाढती टीका

जावेद अख्तर यांच्या आधी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी या घटनेवर आपली नाराजी व्यक्त केली आहे. अभिनेत्री जायरा वसीम, राखी सावंत आणि सना खान यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नितीश कुमार यांच्या वर्तनावर टीका केली आहे. जायरा वसीमने म्हटले की, “एखाद्या महिलेची प्रतिष्ठा आणि शालीनता ही खेळण्याची गोष्ट नाही, विशेषतः सार्वजनिक व्यासपीठावर. एका मुस्लिम महिलेचा हिजाब इतक्या सहजपणे, तेही हसत ओढणे अत्यंत संतापजनक आहे. सत्ता कोणालाही मर्यादा ओलांडण्याची परवानगी देत नाही. नितीश कुमार यांनी त्या महिलेकडे माफी मागितली पाहिजे.”

प्रकरणावर राजकीय आणि सामाजिक प्रतिक्रिया

या घटनेनंतर केवळ मनोरंजनसृष्टीतच नव्हे, तर राजकीय आणि सामाजिक स्तरावरही चर्चा रंगली आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुला, मेहबुबा मुफ्ती यांच्यासह राजद-काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. महिला सन्मान, धार्मिक स्वातंत्र्य आणि सार्वजनिक वर्तनाच्या मर्यादा या मुद्द्यांवर पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर वाद निर्माण झाला आहे. दरम्यान, या प्रकरणावर नितीश कुमार यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

महिला डॉक्टरने बिहार सोडले?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, संबंधित महिला डॉक्टर नुसरत परवीन यांना घटनेमुळे मानसिक धक्का बसला असून, त्यांनी बिहार सोडून थेट कोलकाता गाठले आहे. विशेष म्हणजे, ज्या सरकारी नोकरीचे स्वप्न त्यांनी पाहिले होते, ती नोकरी जॉइन करण्यासही त्यांनी सध्या नकार दिला आहे. "मी शाळा आणि कॉलेजमध्ये नेहमी बुरखा घालूनच शिक्षण घेतले. माझ्यासाठी बुरखा हा केवळ कपडा नसून माझ्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. त्या दिवशी कार्यक्रमात अनेक लोक उपस्थित होते, काही जण हसत होते. एक मुलगी म्हणून मला ते अपमानास्पद वाटले," असे संबधित महिलेचे म्हणने आहे.